असा पाऊस पिसाट, असा सोसाट्याचा वारा
सारे फाटले आकाश, सांडे भराभरा गारा
असा कोसळे पाऊस, माती चिंब चिंब झाली
गारा वेचायला सखे, तुही वादळात आली
गारा वेचता वेचता, रूप सांडले साजणी
माझ्या काळजाचे सखे, झाले गार गार पाणी
तुझ्या ओंजळीत गारा, माझ्या डोळ्यापुढे गारा
तुझ्या मागे पुढे गारा, माझ्या मनी उडे गारा
मीही गार गार झालो, तुही गार गार झाली
गारा वेचताना सखे, भेट हळुवार झाली
सखे ओल्याचिंब गारा, झाल्या थेंब थेंब गारा
तुझ्या ओंजळीत माझा जीव, वितळला सारा
सखे ओंजळीत तुझ्या, वाटे पुन्हा पुन्हा वितळाव
तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव ||४||
No comments:
Post a Comment