Feb 10, 2010

मनाचा कोपरा...


काय वाटतं तुझ्याविषयी ते
जमलंच नाही तुझ्यासमोर मांडायला
भावना ओथंबून आल्या तरी
शब्दच तयार नव्हते सांडायला

मनात साठलेलं सगळं
काय काय अन् किती किती
तुला समजेल का सगळं नीट
हीच एक मला भीती

चातकासाठी जसा पाऊस
जशी आंधळ्यासाठी दृष्टी
कसं पटवून देऊ तुला
तूच हे सगळं माझ्यासाठी

तुझ्यावाचून मी म्हणजे
जसा घरट्यावाचून पक्षी
तू नसताना विझून जाते
आभाळातलीही चांदणनक्षी

म्हटलं तू जाताना तरी
तुला सगळं सांगून टाकावं
भावनांनी गच्च भरलेलं
मन मोकळं करून घ्यावं

मन मोकळं केलं तरी
एक कोपरा तुझाच असेल
कधीही परतून आलीस तरी
तुला तो रिकामाच दिसेल

No comments:

Post a Comment