Jun 3, 2011

चिंब भिजलेले, रूप सजलेले

ह्या रिमझिम झिलमील पाउस धारा तन-मन फुलवून जाती,
सहवास तुझ्या मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती,
हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा,
उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे,
चिंब भिजलेले, रूप सजलेले,
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 1

ओढ जागे राज सारे अंतरी सुख बोले,
सप्तरंगी पाखरू हे इंद्रधनू बघ आले,
लाट ही वादळी मोहुनी गाते,
ही मिठी लाडकी भोवरा होते,
पडसाद भावनांचे रे बंध न कुणाचे,
दाहीदिशात गाणे बेधुंद प्रीतीचे,
चिंब भिजलेले, रूप सजलेले,
बरसुनी आले रंग प्रीतीचे - 2

कोण आले पंख आले रंग हे सुखाचे,
रोमरोमी जागले दीप मग स्वप्नांचे,
बरसतो मोगरा थेंब गंधाचे,
भरजरी वेड हे ताल चंदाचे,
घन व्याकुळ रिमझिमणारा, मन अंतर दरवळणारा,
हे स्वळग-सुखाचे गाणे, हे गीत प्रीतीचे,
चिंब भिजलेले, रूप सजलेले,
बरसुनी आले रंग प्रीतीचे -3

Jan 17, 2011

तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव - १५

तुझे लांब लांब केस, तुझी लांब लांब वेणी
तुझ्या केसामध्ये माझ, मन गुंतला साजणी
जीव गुंतला केसात, मन गुंतलं गुंतलं
तुझ्या सौंदर्याचा त्यात, धन गुंतलं गुंतलं
सखे चालतेस तेव्हा, वेणी ऐटीत हलते
खुल्या माळावर जशी, कुणी नागीण डोलते
तिला ठेऊ नको मागे, सखे तिला पुढे टाक
धन पडले समोरी, आला चोरावरी धाक
सखे नाही भरवसा, काळ कोठून येईल
तुझ्या सौंदर्याच धन, कोण लुटून घेईल (नेईल)
लाख मोलाची साजणी, तुझ्या रूपाच हे धन
तुझी वेणी टाक पुढे, तिला करू दे राखण
आम्ही फुकटात किती, त्यांच्याकडे लक्ष द्याव
तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव ||१५||

Jan 10, 2011

तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव - १४

तुझ्या रुपाची सजणी, आला बहरून मळा
तुला बघायला जीव, झाला डोळ्यामध्ये गोळा
कस रहाव ताब्यात, मन कस रहाव शांत
माझ्या भोवताली फुले, तुझ्या रूपाचा वसंत
तुझा फुलाला वसंत, गंध मातीलाही आला
देठादेठात मोगरा, देह मोगर्याचा झाला
देह झाला मोगर्याचा, फुले चांदण्याचे यावे
चंद्र धरतात हाती, पाय मातीला लागले
सखे जन्मलो मातीत, माती बदलावी कशी ?
खुल्या चांदण्याच्यासाठी, नाती बदलावी कशी ?
माती बदलावी कशी, असो मातीवर लळा
तुझ्या मातीमध्ये फुले, प्रेमाचा सोहळा
नात जीवाच मातीशी, तुला ठाऊक असाव
तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव ||१४||

Jan 3, 2011

तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव - १३

तुझी भरदार काया, तुझी नाजूक कंबर
कर्दळीच्या फांदीवर, कुणी टांगले झुंबर
तुझी चाल तुरु-तुरु, कधी चाले हळु-हळु
सखे थांबुन कशाला, पाहतेस हळु-हळु
सखे थांबुन कशाला, पाहतेस वळु-वळु
सखे भलत्याच वेळी, वळुनिया पाहू नये
आग चालता चालता, इथ तिथ लावू नये
आग लावली गावात,  सारा जाहला तितंबा
लोक चावट सगळे, उगाच मारतात बोंबा
जिथ तिथ सौंदर्याचा, तोरा दावू नये राणी
सारी मातीत जाईल, लाख मोलाची जवानी
इथ जीव गेला माझा, तिथे खेळ तुझा झाला
तूच फोडल्यास काचा, आळ माझ्यावरी आला
तुझ्या अश्या वागण्याने, होतो कासावीस जीव
तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव ||१३||

Dec 27, 2010

तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव - १२

तुझ्या ओंठाची कमाल, तुझे ओंठ लाल लाल
ओंठ चोरून हसती, माझी होती हालहाल
ओंठ बोलतही नाही, काही कळणार कसे ?
ओंठ बोलाल्यावाचून, सूर जुळणार कसे  ?
कधी तारतात ओंठ, दूर सरतात ओंठ
तुला सांगतो मी खर खर, मान खंर किंव्हा खोट
ओंठ चाटलेही नाही, कशी भागणार भूक ?
तुझ्या ओंठामध्ये नशा, माझ्या ओंठात तहान
तुझ्या एका घोटासाठी, माझ आयुष्य गहाण
माझ आयुष्य गहाण, सखे तुझ्या कडे सार
ओंठ खुलू दे एकदा, हाक मनातून मार
एका हाकेसाठी कुणी, किती टांगून रहाव
तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव ||१२||